Wednesday 1 June 2016

अजिंठा (लेणी) Ajantha Caves

प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी क्वचित मंदिरेसुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गांवर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत. त्यांचा उद्देश वाटसरूंना सुरक्षित आश्रय स्थान मिळावे असा असे. त्यांना राजाश्रय, धर्माश्रय व लोकाश्रय असे. अजिंठा गावाजवळची लेण्यांची निर्मितीही याच उद्देशातून सुरू झाली असावी. पुरातत्त्वशास्त्रीय पुराव्यानुसार ही लेणी दोन वेगवेगळ्या कालखंडात निर्माण केली गेली. ९, १०, १२, १३ व १५-अ ही लेणी हीनयान कालखंडात कोरली गेली असावीत. हा कालखंड साधारणतः इ.स.पूर्वीच्या दुसर्‍या शतकाच्या सुमारास सुरू झाला. या सगळ्या लेण्यांतून बुद्धाचे दर्शन स्तूप-रूपांत होते. ही सोडून १ ते २९ क्रमांकांची लेणी साधारणतः ८००-९०० वर्षांनंतर (इ.स.च्या सहाव्या व सातव्या शतकाच्या आसपास) महायान कालखंडात निर्माण केली गेलेली असावीत. या लेण्यांतून बुद्धाचे सर्वसामान्य लोकांस परिचित असे रूप दिसून येते. महायान लेणी वाकाटक राजांचा राजवटीत निर्मिली गेली, त्यामुळे त्यांस बऱ्याचदा वाकाटक लेणी असेही संबोधले जाते.

वाकाटक साम्राज्याच्या ऱ्हासानंतर यांचे निर्माण अचानक थांबले व ही लेणी योजित भव्यतेपासून वंचितच राहिली

अजिंठा येथे एकूण २९ लेणी आहेत. ही सर्व लेणी वाघुर नदीच्या आसपास विखुरलेली आहेत. लेणी नदीच्या पात्रापासून १५-३० मीटर (४०-१०० फूट) उंचीवर कातळात आहेत.











हीनयान कालखंडातील लेण्यांपैकी ९ व १० क्रमांकाची लेणी ही चैत्यगृह आहेत व १२, १३, आणि १५-अ क्रमांकाचे लेणे विहार आहे. महायान कालखंडातील लेण्यांपैकी १९, २६ व २९ क्रमांकाची लेणी चैत्यगृहे असून १, २, ३, ५, ६, ७, ८, ११, १४, १५, १६, १७, १८, २०, २१, २२, २३, २४, २५, २७ व २८ क्रमांकाची लेणी विहार आहेत.

विहार साधारणपणे चौरस आकाराचे असून त्यांची लांबी-रुंदी १७ मीटर (५२ फूट) पर्यंत आहे. हे विहार मुख्यत्वे भिक्षूंना राहण्यासाठी होते तर चैत्यगृह हे पारंपरिकरीत्या पूजाअर्चेसाठी वापरण्यात येत. कालांतराने विहारांतही मूर्तींची स्थापना झाली. बऱ्याच विहारांना सोपा व आंगण करण्यात आले व तेथे दगडात कलाकुसर व चित्रे काढण्यात आली.

अजिंठा गावापासून अजिंठा लेण्या ह्या ११ किलोमीटर अंतरावर आहे . इ.स.पूर्व २०० ते ६५० या काळातल्या त्या अजिंठा लेण्या कोरीव कामात व रंगीत भिंतीचित्रासाठी जग प्रसिध्द आहेत . इंग्रजी लष्करातील अधिकाऱ्यांना १८१९ साली या लेण्यांचा शोध लागला.एकूण ३० लेण्या आहेत व त्या सर्व लेण्या बौद्ध धर्मीय आहेत याच प्रमाणे कोरिवे काम असलेले बौद्ध मंदिरे, गुफा, बुद्धांच्या जीवनावर कोरलेले अनेक प्रसंग हे अतिशय आकर्षित व आश्चर्य करणारे आहेत




औरंगाबाद अजिंठा ह्या रस्त्यावरून जातांना ह्या लेण्यांचे अतिशय विस्मरणीय असे दृश्य दिसून येते ह्या लेण्यांना भेट देण्यास ४ किलोमीटर पासून बस व्यवस्था केली असून इतर गाड्यांनी होणारे प्रदूषण हे टाळले जाते . येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी पर्यटक निवास ,शासकीय विश्रामगृह व लॉज आहेत.मार्ग : - जळगाव रेल्वे स्टेशन पासून 59 किलोमीटर अंतरावर . औरंगाबाद पासून ९९ किलोमीटर अंतरावर वायव्य दिशेला .

लेण्यांमधील भिंती आणि छतांवर काढलेल्या देखण्या चित्रांमधून भगवान बुद्धांच्या जीवनातील वेगवेगळे प्रसंग आणि बौद्ध देवता यांचे व्यापक चित्रण आढळते. सुमारे 700 वर्षे वापरात असलेल्या अजिंठा लेण्या काही कारणांमुळे अशाच सोडून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर सुमारे 1000 वर्षाहून अधिक काळ लेण्या अज्ञात राहिल्या. ब्रिटिश लष्करी अधिकारी जॉन स्मिथ 1839 मध्ये शिकारीसाठी निघाला होता. यावेळी त्याला या लेण्या दिसून आल्या. बरीच स्वच्छता केल्यावर त्या लोकांसाठी खुल्या करण्यात आल्या.

अशी सापडली लेणी

शिकारीसाठी जॉन स्मिथ अजिंठा लेणीच्या घळीसारख्या पर्वतावर आला होता. येथून त्याला पर्वताच्या उदरात काहीतरी बांधकाम दडले असल्याची शंका आली. त्याने नोकरांच्या मदतीने शोध घेतला असताना येथे लेण्या आढळून आल्या. त्यानंतर लेण्यांची स्वच्छता करण्यात आली.
सप्तकुंड तलाव

घळीसारख्या पर्वतावरुन धबधब्याच्या रुपांनी कोसळणारे निळेशार पाणी या तलावात जमा होतो. त्यामुळे याला सप्तकुंड असे नाव पडले असावे. अमग्डॅलॉईड प्रकारच्या खडकात या लेण्या कोरण्यात आल्या आहेत. यांची उंची 56 मीटर असून सुमारे 550 मीटरपर्यंत घळीच्या आकारात पसरलेल्या आहेत.

अशी काढली दगडांवर सुंदर चित्रे

प्रथम धातुमिश्रित माती घेण्यात आली. त्यात डोंगरातील दगडांचे बारीक कण, वनस्पतींचे तंतु, तांदळाचा भुसा, गवत, बारीक वाळू आदी वापरुन दगडांवर कॅनव्हास तयार करण्यात आला. त्यानंतर तो लिंबू पाण्याने धुण्यात आला. रंग देण्याची पद्धत साधी आणि सुटसुटीत होती. आधी आऊटलाईन काढली जाई. त्यानंतर वेगवेगळे रंग चिकटविले जात असे. यासाठी विशिष्ट पद्धतीची रंगसंगती वापरण्यात आलेली नाही. आवश्यकतेप्रमाणे रंगात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे या शैलीने जगात वेगळेपण टिकवून ठेवले आहे.

तोरणा किल्ला (Torana Fort)

तोरणा किल्ला Torana Fort – १४०० मीटर उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
पुणे जिल्ह्यातील पुणे डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.

शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळात जे काही किल्ले घेतले त्यापैकी एक किल्ला तोरणा. गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव पडले तोरणा. महाराजांनी गडाची पहाणी करतांना याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे ‘प्रचंडगड’ असे नाव ठेवले.पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रागेंतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत. यापैकी पहिल्या पदरावर तोरणा व राजगड वसलेले आहेत तर दुसऱ्या पदराला भुलेश्वर रांग म्हणतात. पुण्याच्या नैऋत्येस असलेल्या पर्वतराजीमध्ये उत्तर अक्षांश व पूर्व रेखांशावर हा किल्ला आहे. याच्या दक्षिणेला वेळवंडी नदी व उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत.











इतिहास : हा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरुन हा शैवपंथाचा आश्रम असावा. इ.स. १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहमनी राजवटीसाठी मालिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले. गडावर काही इमारती बांधल्या. राजांनी आग्ऱ्याहून आल्यावर

अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यात ५ हजार होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजांचा वध झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इ.स. १७०४ मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले. पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महारजांकडेच राहिला. विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

गडावर जाण्याच्या वाटा :

गडावरील मेंगाई देवीच्या मंदिरात १० ते १५ जणांची राहण्याची सोय होते. जेवणाची सोय आपण स्वतःच करावी. मेंगाई देवीच्या मंदिराच्या समोरच बारामही पाण्याचे टाके आहे. गडावर जाण्यासाठी अडीच तास वेल्हेमार्गे, ६ तास राजगड-तोरणा मार्गे लागतात.

सूचना : गडावर जाणारी वाट :- कठीण – राजगड -तोरणा मार्गे

गणपतीपुळे (Ganpatipule)

गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या रत्नागिरी तालुक्यातील २७४.६४ हेक्टर क्षेत्राचे गाव.

गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र ह्यामुळे हे देऊळ आगळेवेगळे आहे. गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्याने तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त असते. १ किलोमीटर लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय आहे.

गणपतीपुळे हे रत्नागिरीपासून सुमारे २४ किलोमीटर अंतरावर आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (S.T.) मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक इत्यादी शहरांपासून गणपतीपुळे येथे जाण्यासाठी थेट बससेवा पुरवते.















गणपतीपुळे येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ (M.T.D.C.)चे विश्रामगृह आहे. त्याशिवाय देवळातील भटजींच्या घरीसुद्धा राहण्याची सोय होऊ शकते.

गणपतीपुळे हे मुबईपासून ३७५ किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरून जाताना निवळी फाट्यावरून उजव्या हाताला वळले की ३२ किमी अंतरावर गणपतीपुळे आहे. तसेच जर रेवस रेड्डी सागरी महामार्गाने गेल्यास तर व्हाया रत्नागिरी शहरातूनही पर्यायी
मार्ग आहे.

गणपतीपुळ्याला सुंदरसा समुद्र किनारा लाभला आहे. गणपतीपुळ्याला जाण्यासाठी मुंबई आणि पुण्यावरुन एसटीची एशियाड बस सेवा आहे. जवळच नेवरे आणि भंडारपुळे ही सुंदर गावे आहेत. गणपतीपुळे आणि आसपासचा परिसर अतिशय आल्हाददायक आहे. इथून जवळच २ किमी अंतरावर मालगुंड ह्या गावात कवी केशवसुत ह्यांचे स्मारक आहे.

गणपतीपुळे हे रेवस रेड्डी सागरी महामार्गावर वसलेले पर्यटन स्थळ आहे. ह्या गावाच्या इतिहासात असेही म्हटले जाते की गणपतीपुळे आणि आसपासच्या नेवरे, मालगुंड आणि भंडारपुळे ह्या गावांत गणेशोत्सव काळात गणपतीची मूर्ती आणून आराधना केली जात नाही. गणपतीपुळ्याचा लंबोदर हाच ग्रामस्थांचा गणपती अशी येथील ख्याती आहे. गणपतीपुळेलगतच भंडारपुळे हे गाव आहे. जितका गणपतीपुळे इथला आहे तितकाच भंडारपुळे गावचा समुद्रकिनाराही रमणीय आहे. ह्या सर्व गावांत प्रामुख्याने भंडारी, कुणबी आणि कोकणस्थ ब्राह्मण समाज आहे. इथून काही अंतर पुढे गेल्यावर ६ किमी अंतरावर नेवरे गाव आहे, नेवरे गावाजवळे सुरूचे बन व वाळूचा किनारा आहे. त्याच रस्त्याला लागून रत्नागिरीच्या दिशेने ’आरे वारे’ हा सनसेट पॉइन्ट आहे.. ’नवरा माझा नवसाचा’ आणि ’फुल थ्री धमाल’ ह्या चित्रपटांचे शूटिग गणपतीपुळ्याला झाले होते. रत्नागिरी हे जवळचे रेल्वेस्थानक व शहर आहे. रत्नागिरी आगारातून १०-१५ मिनिटानी गणपतीपुळे येथे जाण्यासाठी बसेस आहेत.

हरिहरेश्वर बीच

महाराष्ट्रातल्या कोकणातली सावित्री नदी जिथे अरबी समुद्राला मिळते तेेथे तिच्या मुखावर हरिहरेश्वर नावाचे गाव आहे. नदीच्या दुसऱ्या (उत्तर) तीरावर श्रीवर्धन हे गाव आहे. ही दोन्ही गावे रायगड जिल्ह्यात येतात. हरिहरेश्वरला मुंबई-गोवा रस्त्यावरील दासगावपासून फाटा फुटतो, तर श्रीवर्धनचा रस्ता माणगाव येथे सुरू होतो. श्रीवर्धनवरूनही होडीने हरिहरेश्वरला जाता येते. माणगाव कोकण रेल्वेवरही येते. तेथूनही हरिहरेश्वरला जाता येते.

कोकणपट्टीतील एक निसर्गरम्य असे पवित्र तीर्थस्थान. एका बाजूला हिरव्यागार गर्द वनश्रीने नटलेला डोंगर तर दुसऱ्या बाजुला नयनरम्य स्वच्छ व निळा समुद्र व रुपेरी वाळूने आकर्षित करणारा अमर्याद समुद्रकिनारा. तसेच नारळी पोफळीच्या बागांच्या साक्षीने आणि डोंगरदऱ्यांच्या कुशीत विसावलेले हे तिर्थस्थान आहे. हरिहरेश्वर, कालभैरव योगेश्वरी, सिद्धिविनायक व हनुमान अशी चार मंदिरे तसेच समुद्रकिनारी असणारे विष्णुपद, गायत्रीतीर्थ, वक्रतीर्थ, सूर्यतीर्थ, यज्ञकुंड, विष्णुतीर्थ अशी अनेक ठिकाणे आहेत. कर्नाटकातील गोकर्ण ते ठाणे जिल्ह्यातील निर्मळ हे पाचशे मैलांचे दक्षिणोत्तर अंतर व ४८ मैल रुंद एवढा प्रचंड परिसर हा श्री क्षेत्र हरिहरेश्वराचा परिसर मानण्यात येतो. सावित्रीला दिलेल्या वराप्रमाणे ब्रह्मदेवाने सावित्रीसह यज्ञ केला. या हरिहरेश्वर क्षेत्राच्या दक्षिण दिशेला व उत्तर दिशेला बारा ज्योतिर्लिंग स्थाने आहेत. देशात ऐकूण १०८ तीर्थस्थाने असली तरी प्रमुख तीर्थ हरिहरेश्वर मध्ये आहे असे मानले जाते. हरिहरेश्वरचा महापवित्र क्षेत्र असा उल्लेख 'श्री हरीहरेश्वर माहात्म्य' पोथीमध्ये आहे. हरिहरनावाच्या पश्चिमाभिमुख असलेल्या या देवात हरिस्वरूप व हरस्वरुप या दोन्हींचा संगम झाला आहे.









रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे स्थान दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. हरिहरेश्वरला भारतातील एक महत्वाचे तीर्थस्थान मानले जाते. हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी, पार्वती या चार टेकड्यांच्या कुशीत आहे. गावाच्या उत्तरेकडे हरिहरेश्वराचे देऊळ आहे या क्षेत्रास भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळाला असल्याचे मानले जाते. त्यामुळेच याचा संदर्भ देवघर किंवा देवाचे निवासस्थान असाही दिला जातो. श्री हरिहरेश्वर हे शिवस्थान पेशव्यांचे कुलदैवत आहे. येथे असलेली काळभैरव आणि श्री योगेश्वरी यांची देवळे देखील महत्वाची स्थाने आहेत.

हर‍िहरेश्वराचे देऊळ बरेच जुने आहे. ते शिवकालीन असावे असा अंदाज आहे. परंतु, बांधकामाचा निश्चित कालखंड सांगता येत नाही. पहिल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार 1723 मध्ये केल्याचे पुरावे आहेत. येथील सर्व देवळांना खास कोकणी पद्धतीची उतरती छपरे आहेत. हरिहरेश्वर क्षेत्रातील सर्वांत महत्वाचे देऊळ काळभैरवाचे आहे. याची एक आख्यायिका अशी आहे, की बळी राजाकडून तीन पावले भूमी घेताना वामनाने ठेवलेले दुसरे पाऊल हरिहरेश्वरापासून सुरू झाले. दुसरी आख्यायिका अशी आहे की अगस्ती मुनी शांततेच्या शोधात भ्रमण करत होते तेव्हा हरिहरेश्वरातील चार स्वयंभू लिंगांच्या दर्शनाने त्यांचे मन शांत झाले.
सर्वसाधारणपणे प्रथम काळभैरवाचे दर्शन, नंतर हरिहरेश्वराचे दर्शन करून परत काळभैरवाचे दर्शन घ्यावे अशी प्रथा येथे आहे. या क्षेत्रात ज्या चार टेकड्या आहेत त्यांच्यासारखी रचना हरिहरेश्वराच्या लिंगावर दिसून येते. या दोन्ही देवळात दर्शन घेतल्यावर कराव्या लागणाऱ्या प्रदक्षिणेचा मार्ग डोंगर आणि समुद्राजवळच्या खडकांवरून जातो. या मार्गावरील शे-दीडशे पायऱ्या खाली उतरून त्या डोंगराची प्रदक्षिणा केली जाते. या संपूर्ण प्रदक्षिणेचे अंतर एक कोस असल्याने तिला कोसाची प्रदक्षिणा असे म्हणतात. या मार्गातून दिसणारा समुद्र आणि तिथले सृष्टीसौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. या क्षेत्राला नयनरम्य समुद्रकिनारा लाभला आहे. येथे फेसाळणाऱ्या समुद्राच्या लाटा आणि त्या लाटांचा नाद आपल्या कानात घुमू लागतो. त्या लाटांची लय आपल्याला तरंगातून दिसू लागते. या सागराचे संगीत ऐकताना मन शांतावते. आयुष्यातील चिंता, काळज्यांना तात्पुरता का होईना पूर्णविराम मिळतो.

हरिहरेश्वरमध्ये राहण्या जेवण्याची उत्तम सोय आहे. येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाचे विश्रामगृह आहे. तेथे पर्यटकांना सर्व सोयी मिळू शकतील. शिवाय खासगी हॉटेलही बरीच आहेत. शिवाय घरगुती रहाण्याची अगदी स्वस्तात सोयही येथे होते. त्यामुळे कोकणी पाहुणचार कसा असतो याचाही अनुभव घेता येतो.
हे क्षेत्र मुंबईपासून 216 किलोमीटर आणि पुण्याहून 140 किलोमीटरवर आहे. येथे पोहोचण्यासाठी बस किंवा खासगी वाहनांची मदत घ्यावी लागेल.